|
आमदार संदीप नाईक यांच्या लक्षवेधी सूचनेवर शासनाचे उत्तर
नवी मुंबईतील, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या मार्गावर मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी फेरसर्वेक्षण केले जाईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत दिली. ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यांनी या संबंधी लक्षवेधी सूचना मांडली होती.
नवी मुंबईत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी सिडको प्राधिकरणाने मेसर्स दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनकडून सर्वेक्षण करून घेतले होते. नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात वर नमूद केलेल्या मार्गांचा समावेश आहे काय? अशी विचारणा करणारी लक्षवेधी सूचना आ. संदीप नाईक यांनी मांडली होती. हा मार्ग प्रवासी भारमान आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे लेखी उत्तर शासनाने दिले.
|
त्यावर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली असता वाशी ते दिघा या परिसरातील मार्ग आर्थिक आणि प्रवासी क्षमतेच्यादृष्टीने प्रबल नसल्याचे विधान कशाच्या आधारावर करण्यात आले आहे? असा सवाल आ.नाईक यांनी केला. आणि या मार्गावरील मेट्रो रेल्वेची आवश्यकता सभागृहात मुद्देसूदपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली.
वाशी ते दिघा या मार्गावर धावणाèया हार्बरच्या उपनगरीय गाड्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी असतात. या परिसरात ठाणे-बेलापूर हा मोठा औद्योगिक पट्टा आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. आयटी पार्क आहेत. लवकरच या परिसरात विविध देशांच्या राजदूतांची कार्यालये सुरू होणार आहेत. पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यावर मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या भागातून विमानतळाकडे जाणारी वाहतूक याच मार्गातून पुढे जाणार आहे. एमएमआरडीएचा मुंब्रा- कळवा-ठाणे हा मेट्रो प्रकल्प भविष्यात सुरू होणार आहे. या सर्व परिस्थितीचा विचार केल्यास वाशी ते दिघा या परिसरात वाहतूक कोंडीची भीषण समस्या निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे या भागात मेट्रो रेल्वे सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून सिडकोच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पात समावेश करण्यासाठी या मार्गाचे फेरसर्वेक्षण करावे, अशी आग्रही मागणी आ. नाईक यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत qशदे यांनी या चर्चेत भाग घेत आ. नाईक यांची मागणी योग्य असल्याचे म्हटले. मेट्रो रेल्वेसाठी झालेल्या सर्वेक्षणाबाबत त्यांनी शंका उपस्थित केली. वाशी ते दिघा या मेट्रो रेल्वेच्या मार्गामुळे ठाण्यापासून नवी मुंबईचा परिसर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जोडला जाणार आहे. त्यामुळे या मार्गाचा मेट्रो रेल्वेमध्ये समावेश होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील यांनी देखील आ. नाईक यांची मागणी रास्त असल्याचे सांगितले. वाशी ते दिघा या परिसरात एमआयडीसी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती असून येथील लोकसंख्या पाहता मेट्रो रेल्वे सुरू होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आ. नाईक हे या भागातील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना येथील समस्यांची चांगली जाणीव आहे,असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मेट्रो रेल्वेच्या बेलापूर ते पेंढार या ११.१५ कि.मी. पट्ट्यातील निविदा उभारणीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. हा मार्ग श्रीमंतांच्या लोकवस्तीतून जातो. तेथून लोक मर्सिडीस् गाड्यांमधून प्रवास करतात. परंतु जेथे लोक कष्टाने घाम गाळतात, जो गरीबांचा मार्ग आहे, जिथे लाखोंची लोकवस्ती आहे. त्या वाशी ते दिघा या मार्गाचा मेट्रो रेल्वेमध्ये समावेश केला नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. आणि या मार्गाच्या समावेशासाठी फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली.
नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आ. नाईक यांच्या लक्षवेधीवर सविस्तर उत्तर दिले. मुंबई बाहेर नवी मुंबईत पहिल्यांदाच मेट्रो प्रकल्प उभा राहतो आहे. एकूण सहा मार्गात निर्माण होणाèया या प्रस्तावित प्रकल्पाला राबविण्यासाठी राज्य शासनाने इंडियन ट्रामवेज अॅक्ट १८८६ च्या तरतुदीनुसार या मार्गास प्रसिद्धी देवून प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या. ६ ऑक्टोबर १९१० रोजीच्या आदेशान्वये सिडकोला त्या प्रकल्पासाठी प्राधिकृत केले आहे. बेलापूर, खारघर, तळोजा , कळंबोली, खांदेश्वर हा छन्नमार्ग तीन टप्प्यात तयार होणार आहे. यापैकी बेलापूर ते पेंढार या ११.१५कि.मी. लांबीचा टप्पा क्र. १ साठी सिडकोने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ऑगस्ट २०१४ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सिडको प्रयत्नशील आहे. या छन्नमार्गाचे उर्वरित दोन टप्पे ऑगस्ट २०१५- २०१६ सालात सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. नवी मुंबईतील वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या परिसरातील मार्गांचा समावेश करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री जाधव यांनी दिली.
|
|
|