दि. बा. पाटील यांना अपेक्षित प्रकल्पग्रस्तांसाठीच्या हिताचे धोरण मंजूर करुन घेवू
आमदार संदीप नाईक यांचे आवाहन
प्रकल्पग्रस्तांचे लढावू नेते दिवंगत दि. बा. पाटील यांना अपेक्षित प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे धोरण राज्य शासनाकडून मंजूर करुन घेवू त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची पराकाष्ठा करु, असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी केले आहे.
दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने ङ्गप्रकल्पांच्या आक्रमणात भूमीपुत्रांच्या गावठाणांचे आणि अस्तित्वाचे जतनफ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन कोपरखैरणे येथील शेतकरी समाज सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार नाईक यांनी आपली मते मांडली.
खारी कळवा प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मोरेश्‍वर पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे, ऍड. बाबाजी ठाकूर, तुषार गावडे, संपादक राजेंद्र घरत, माजी नगरसेवक दीपक पाटील, विकास पाटील, ऍड. पी. सी. पाटील, आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील आदी मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले होते.प्रकल्पग्रस्तांसाठी दि. बा. पाटील यांनी केलेेले कार्य आदर्शवत असून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची कार्यपध्दती प्रभावी होती, असे सांगून आमदार नाईक यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
संपूर्ण ठाणे जिल्हयात आणि महाराष्ट्रभर प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरु आहे. मात्र या लढयात एकत्रितपणाचा अभाव असल्याची खंत आमदार नाईक यांनी व्यक्त केली. नवी मुंबई, रायगड, उरण या भागातील प्रकल्पग्रस्तांच्या लढयात सुसंवाद आढळतो तसाच तो इतरत्र हवा, असे मत त्यांनी मांडले. अशा प्रकारच्या चर्चासत्राच्या माध्यमातून आपल्या मागण्यांचे तज्ञ व्यक्तींकडून विश्‍लेषण करुन त्या मंजूर व्हाव्यात यासाठी ज्या साच्यात मांडण्याची गरज आहे
त्याविषयी विचारमंथन होईल, अशी आशा व्यक्त केली. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी शासनस्तरावर आणि विधानसभेत पाठपुरावा करीत असताना प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांकडून माहितीरुपी सहकार्य नेहमीच मिळत असते, याबद्दल आमदार नाईक यांनी त्यांना धन्यवाद दिले. कोणतेही धोरण आखताना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा आणि सूचनांचा त्यामध्ये अंतर्भाव झालाच पाहिजे. प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती वेगळी आहे. तिला राज्यातील परिस्थितीशी जोडू नये. प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र धोरण आणावे, अशीच भूमिका सुरुवातीपासून ठेवल्याची माहिती देखील आमदार नाईक यांनी याप्रसंगी दिली. अलिकडेच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्‍न, औचित्याचा मुद्दा, अर्धा तास चर्चा आदींच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मांडल्या असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्तांच्या हिताची योजना आणण्याचे आश्‍वासन दिले आहे. हे आश्‍वासन ते पाळतील, अशी आशा आमदार नाईक यांनी शेवटी व्यक्त केली..