ग्रामस्थांच्या हिताची आणि सर्वसमावेशक समूह विकास योजना जाहीर केली नाही

तर जनआंदोलन आमदार संदीप नाईक यांचा सरकारला इशारा

समूह विकास योजनेचा अंतिम निर्णय लवकरच होण्याचे संकेत आमदार संदीप नाईक यांच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

नवी मुंबई गावठाण आणि गावठाण विस्ताराच्या समूह विकासाबाबत अंतिम निर्णय लवकरच होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संदीप नाईक यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिले आहेत. ही योजना ग्रामस्थांच्या हिताची आणि सर्व घटकांसाठी सर्वसमावेशक असली पाहिजे. प्रकल्पग्रस्तांच्या हरकती आणि सूचनांचा त्यामध्ये समावेश करूनच अंतिम अधिसूचना काढावी, अन्यथा मोठे जनआंदोलन उभे करू, असा इशारा आमदार नाईक यांनी सरकारला दिला आहे. २०१५ पर्यंतची राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची अधिसूचना २५ जुलै २०१७ रोजी शासनाने काढली. नवी मुंबईतील गावठाण आणि गावठाण विस्तार क्षेत्राचा पुनर्विकास हा समूह विकास योजनेतून करण्यात येणार आहे. मात्र या समूह विकास योजनेबाबत प्रकल्पग्रस्तांचे काही आक्षेप असून त्यामध्ये अनेक त्रुटी देखील आहेत. राज्याची आणि नवी मुंबईची परिस्थिती वेगळी आहे.  ग्रामस्थांच्या  सूचना आणि हरकतींचा समावेश या योजनेत करावा.

 

ग्रामस्थ आणि इतर सर्व घटकांच्या हिताची सर्वसमावेशक  समूह विकास योजना जाहीर करावी यासाठी आमदार नाईक प्रयत्नशील आहेत. शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असून विधिमंडळ अधिवेशनातून तारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा इत्यादींच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या जिव्हाळ्याचा हा विषय त्यांनी मांडला आहे.  तिसर्‍या विधिमंडळ अधिवेशनातही ८ डिसेंबर २०१५ रोजी त्यांनी हा विषय उपस्थित केला होता. त्यावेळी आमदार नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी समूह विकास योजनेबाबत प्रकल्पग्रस्तांचे आणि लोकप्रतिनिधींचे निवेदन प्राप्त झाल्याचे सांगून ते विचाराधीन असल्याचे उत्तरात स्पष्ट केले होते. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामाबाबतच्या मागण्या मान्य कराव्यात. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त, प्रकल्पग्रस्तांच्या संघटना आणि लोकप्रतिनिधींनी ऑक्टोबर २०१७ मध्ये मुख्यमंत्री महोदयांना याविषयी निवेदन दिले आहे.  त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या आणि इतर सर्व घटकांच्या हिताची योजना आणावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी शासकीय स्तरावर आणि विधीमंडळ अधिवेशनातून लावून धरली आहे. मंगळवारी १२ डिसेंबर २०१७ रोजी आमदार नाईक यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विचारलेल्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे.  नवी मुंबईतील गावठाण आणि गावठाण विस्ताराचा पुनर्विकास समूह विकास योजनेतून करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने  एमआरटीपी  कायद्यानुसार सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन स्थानिक प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदल करणे प्रस्तावित आहे.  दोन्ही प्राधिकरणांकरिता हरकती आणि सूचना मागविण्यासाठी स्वतंत्रपणे सूचना ४ मार्च २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये प्रकल्पबाधितांच्या अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांचा देखील समावेश आहे. समूह विकास योजनेबाबत  न्यायालयात दाखल याचिका ( क्रमांक ६१/२०१४) निकाली निघाल्यामुळे अंतिम निर्णय घेण्यास अडथळा उरलेला नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार नाईक म्हणाले की,  समूह विकासाची अंतिम अधिसूचना  सर्वसमावेशक निघेपर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहणार आहे. वेळ पडली तर यासाठी मोठे जनआंदोलन उभे करू.