ऐरोली मतदार संघाचे लोकप्रतिनिधीत्व विधानसभेत करण्याची संधी आपण मला सलग दुसर्‍यांदा दिलीत हे मी माझे भाग्य समजतो. आपणास माहितच आहे की, पहिल्या वर्षातील सुरूवातीचे सहा महिने हे निवडणुकांच्या आचारसंहितेमध्ये गेले. पहिल्या वर्षात झालेल्या विधानसभेच्या सर्व अधिवेशनांमध्ये उपस्थिती दर्शवून नवी मुंबईतील विविध जिव्हाळयाच्या प्रश्‍नांवर आवाज उठविला. या विषयांवर शासनाला सकारात्मक कार्यवाही करण्यास भाग पाडले. आमदार विकास निधीच्या माध्यमातून विविध प्रकारची नागरी सुविधांची विकासकामे प्रस्तावित केली आहेत. त्यापैकी अनेक कामांचा शुभारंभ देखील झाला आहे. विविध विकास प्राधिकरणांकडे पाठपुरावा करुन मतदारसंघात पायाभूत सुविधांसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देवू शकलो, याचे मला समाधान आहे. ही सर्व विकासकामे करीत असताना आमदार पदाच्या मागील कार्यकाळाप्रमाणेच या कार्यकाळात देखील जनतेच्या थेट संपर्कात राहून नागरी समस्यांची सोडवणूक करीत आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि जनता यांना एकाच व्यासपीठावर आणून नागरिकांना भेडसावणारे प्रश्‍न सोडविण्याचे तसेच सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम ‘जनसंवाद’ या नवीन अभिनव उपक्रमातून सुरू केले आहे. ‘आमदार आपल्या दारी’, प्रभाग दौरे, शासकीय बैठका इत्यादी जनताभिमुख उपक्रम सुरूच आहेत. आमदार म्हणून आपल्या अपेक्षांची पूर्ती करण्याचा भरघोस प्रयत्न करीत असतानाच वृक्षारोपण मोहीम, रोजगार मेळाव्यांमधून बेरोजगारांना आधार, बोर्डाच्या धर्तीवरील एसएससी सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, क्रीडा महोत्सवांमधून शालेय क्रीडा नैपुण्याला उजेडात आणणे, असे विधायक उपक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आयोजित केले होेते. आत्तापर्यंतच्या प्रवासात आपल्या सर्वांची भरभक्कम साथ मला लाभली आहे. आपल्या ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या समतोल आणि सर्वांगीण विकासाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी मी कटीबध्द आहे. आधुनिक मतदारसंघाकडून स्मार्ट मतदार संघाकडे आपल्या सर्वांची वाटचाल सुरू आहे. यापुढे देखील आपला विश्‍वास असाच कायम राहिल अशी खात्री आहे.

- आपला
संदीप गणेश नाईक

 

 

 

SSC Sarav Pariksha Event

Job Fair

Green Hope

Krida Sankul